पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) अलिकडे शासकीय कार्यालयात कुठलेही काम घेऊन गेल्यावर ते पूर्णत्वास जावे असे वाटले तर त्यासाठी वजन ठेवावेच लागते असा सर्रास प्रघात पडला आहे.तशी सर्वसामान्य नागरिकांची धारणाच झाली आहे.प्रामाणिकपणे आपल्या कार्यात वाहून घेणारे अधिकारी कामगार हे बोटावर मोजण्या इतकेच आहेत. परंतु अशांपैकी एक असलेले सातारा गटविकास अधिकारी म्हणून अलिकडेच रुजू झालेल्या सतीश बुद्धे यांनी चक्क आपल्या कक्षाबाहेर मी, माझ्या पगारात समाधानी आहे हा फलक लावला आहे. विविध कामांच्या निमित्ताने पंचायत समितीत येणाऱ्या सर्वांचेच लक्ष हा फलक वेधून घेत आहे.
सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी ५ ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारला आणि अवघ्या काही दिवसानंतर बुद्धे यांनी लावलेल्या या फलकामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आपल्या नावाखाली कोणीही गैरप्रकार करू नये, असा स्पष्ट निरोपही बुद्धे यांनी याद्वारे संदेश दिला आहे.
मी दौयावर असताना भेटू शकलो नाही तर मला खाली दिलेल्या मोबाइल क्रमांकावर निवेदने, तक्रारी लेखी स्वरुपात (संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्या अभिप्रायानंतर व्हॉट्सअॅप मेसेज नाव व गावाच्या उल्लेखासह) करावा असे नमूद करण्यात आले आहे.
कार्यालयात माझ्या नावाखाली कोणीही कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करू नये यासाठी हा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. लोकसेवक म्हणून नोकरी करताना शासनाकडून मिळणारा पगार पुरेसा असून, अधिक माया जमविण्याची माझी इच्छा नाही. कार्यालयात काम करण्यासाठी कागदावर वजन ठेवण्याची गरज नाही, जे योग्य काम आहे ते मार्गी लागणारच याची सातारकरांनी खात्री बाळगावी.
– सतीश बुद्धे, गटविकास अधिकारी, सातारा
