लोणी काळभोर [ हवेलीनामा वृत्तसमुह]
प्रभू रामचंद्र, सितामाई व लक्ष्मण वनवासात असताना त्यांचे या पावण भूमीत काही काळ वास्तव्य होते म्हणूनच या क्षेत्रास रामदरा हे नाव प्राप्त झाल्याची अख्यायिका आहे. आज हे ठिकाण तिर्थक्षेत्र रामदरा म्हणून ओळखले जाते. पुणे शहरापासून सुमारे २६ कि.मी. अंतरावर असलेले पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत दक्षिणेस डोंगराच्या कुशीतील तिर्थक्षेत्र श्री रामदरा शिवालय म्हणून ओळखले जाते. येथे ३.५ किमी उंच डोंगरावर सुमारे ६०० वर्षे जुनी एक न्हाणी आहे. सदर ठिकाणास सिता मातेची न्हाणी म्हणून ओळखले जाते.

या न्हाणीत खुप थंड पाणी असते. तिर्थक्षेत्र श्री रामदरा शिवालयात रामनवमीला लोणी काळभोर मधील हजारो नागरिक, पर्यटक व भाविक या उंच डोंगरावर भरउन्हात पवित्र थंड पाणी पिण्यासाठी जात असत परंतू गेल्या काही वर्षांपासून पाणी दूषित झाले होते. न्हाणीमध्ये सुमारे सहा टन वजणाचा मोठा दगड पडल्यामुळे लोकांनी जाणे येणे बंद झाले होते . तिर्थक्षेत्र रामदरा देवस्थान ट्रस्टचे १००८ हेंमतपुरी महाराज तसेच वनविभागचे अधिकारी बळीराम वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने या न्हाणी मधील गाळ तसेच दगड फोडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. डोंगरावर कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्याने व मशीनरी नेणे अशक्यप्राय असल्याने सदर दगड मनुष्यबळाच्या जोरावर फोडून बाहेर काढण्याचा मानस ठरवण्यात आला.

दि. १४ मार्च २०२३ रोजी ग्रीन फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी घण, छन्नी व पहार या पारंपारिक साधनाच्या सहाय्याने सकाळी १० वाजण्याच्या सुमारांस दगड फोडण्यास सुरूवात केली. तो फोडून बाहेर काढण्यास दुपारचे ४ वाजले. त्यानंतर ६०० वर्षापासुन सिता न्हाणीमधील साठलेला गाळ बादलीच्या सहाय्याने काढण्यात आला. कुंडातील गाळ काढून झाल्यानंतर तेथे एक जिवंत झरा लागल्यावर सर्व उपस्थिताचा आनंद गगनात मावेनासा झाला पाण्याचा प्रवाह सुरु होताच सर्वांनी जय श्रीराम, बाबाजी कस कच्चुन,जय हनुमान,भारत माता की जय असा जयजयकार अपसुखपणे बाहेर पडला.

या वेळी वनविभागाचे अधिकारी बळीराम वायकर, वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज काळभोर, जेष्ठ पत्रकार तुळशीराम घुसाळकर, ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे, प्रविण जाधव, विनोद यादव जिवन जाधव, सोन्या जाधव ,संदिप जाधव, सोमनाथ जाधव, पिन्टु जाधव, साईनाथ शिंदे तसेच ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, वनविभाग लोणी काळभोर, वनव्यवस्थापन समिती यांच्या उपस्थितीत कार्य पूर्ण झाले.
