पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर जवळच्या शिरोली, (ता. खेड) परिसरात सोमवारी रात्री भीषण अपघात झाला असून भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहन रस्ता ओलांडणाऱ्या महिलांच्या घोळक्यात शिरले यात दोन ते तीन महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यामध्ये १४ महिला जखमी झाल्या आहेत.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती समोर येत आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या भयंकर घटनेनंतर परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या सर्व महिला अपघात स्थळापासून जवळच असलेल्या मंगल कार्यालयात स्वयंपाकाचे काम करण्यासाठी आल्या होत्या. मध्यरात्री काम संपल्यानंतर त्या पुण्याकडून येणाऱ्या बसमधून खरपुडी फाटा येथे उतरल्या. पश्चिम बाजूकडून पूर्वेकडे रस्ता ओलांडत असताना या महिलांच्या घोळक्याला पुण्याकडून वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यातील तीन ते चार महिला फुटबॉलसारख्या हवेत उडाल्या. या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर १५ महिला गंभीर जखमी झाल्या.
अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या महिलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना एका महिलेचा मृत्यू झाला. अजूनही १४ महिलांवर उपचार सुरू असून यापैकी दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
अपघात झाल्याने जखमी झालेल्या महिलां गरीब कुटुंबातील असून १७ कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
