राजगुरूनगर  (हवेलीनामा ऑनलाइन) पीएमआरडीएने जाहीर केलेल्या प्रस्तावित आरक्षण राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी सोयीचे आणि शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणारे असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी राजगुरूनगर येथे केला.
     खेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने राजगुरूनगरजवळील  चांडोली येथे गुरुवारी  पीएमआरडीए, रिंगरोड, बुलेट ट्रेन, रेल्वे मार्ग आराखड्याच्या विरोधात शेतकरी मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना भेगडे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर पक्षाचे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख,जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते शरद बुट्टे पाटील, दिलीप मेदगे, तालुकाध्यक्ष शांताराम भोसले उपस्थित होते.
   पुढे बोलताना ते म्हणाले, अजित पवार यांच्या मुळशी तालुक्यातील घोटावडे येथील फार्महाऊसची जमीन तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील जागेवर रहिवासी आरक्षण टाकण्यात आले आहे. मात्र या दोन्ही जमिनींच्या लगतच्या सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांच्या क्षेत्रात जाणीवपूर्वक शेती झोन करण्यात आला आहे.
        ‘पीएमआरडीए’चे आरक्षण असे असेल तर त्याला आमचा तीव्र विरोध आहे. याविरोधात जिल्ह्याच्या नऊ तालुक्यातील ८१४ गावांचे संभाव्य बाधित शेतकरी एकत्र करून तीव्र आंदोलन केले जाईल. या आंदोलनाने शेतकरी विरोधी महाआघाडी सरकारला जागे केले जाईल, असा इशारा यावेळी भेगडे यांनी दिला.
        प्रस्तावित पीएमआरडीए आराखडा विरोधात संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. धरणग्रस्तांचे पुनर्वसनासाठी गायरान, वन विभागाच्या जमिनीवर आरक्षण करा. पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघेल असे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *