पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर नजीक चार दिवसापूर्वी गोळीबार करत चारचाकी गाडीवर दरोडा टाकून तब्बल तीन कोटी साठ लाख रुपये पळवले.यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी 72 तासात सहा जणांना गजाआड केले त्यांच्यापैकी दोघांकडून एक कोटी 43 लाख रुपये हस्तगत केले आहेत अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर नजीक दि.26 ऑगस्ट रोजी पहाटे 2:30 च्या सुमारास वरकुटे पाटी नजीक एका स्कार्पिओ गाडीतून नांदेड लातूर व सोलापूर येथून पार्सल घेऊन भावेश अमृत पटेल रा.कहोडा ता.उंजा जि.महेसाना गुजरात जात असताना गतिरोधक आल्याने गाडीचा वेग कमी झाल्याने तेथे हातात लोखंडी राॅड घेऊन गाडीवर हल्ला केला परंतु पटेल यांनी गाडीचा वेग वाढवला तेंव्हा त्या हल्लेखोरांनी चारचाकी वाहनातून जवळपास सात ते आठ किलोमीटर पाठलाग केला दरम्यान पाठीमागून स्कार्पिओ गाडीवर गोळीबार केला व एक गाडी समोर आडवी लावून गाडी थांबवली.दरोडेखोरांनी पटेल व सहकारी विजयभाई सोळंखी यांना गाडीतून उतरून आपल्या गाडीतून घेऊन गेले व तीन कोटी साठ लाख रुपये लुटून त्यांना काही अंतरावर नेऊन स्वामी चिंचोली परिसरात सोडले.त्यावर त्यांनी इंदापूर पोलिसात तक्रार दाखल केली.
घडलेल्या घटनेचे गांभीर्य असल्याने पोलीस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांनी ताबडतोब स्थानिक गेन्हे शाखेचे तीन पथके पोलीस निरीक्षक अशेक शेळके यांच्या नेतृत्वाखालील तयार केली तर इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर मोरे यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र पथके तयार केली.तांत्रिक विश्लेषणावरुन हा गुन्हा सागर शिवाजी होनमाने रा.कुर्डूवाडी ता.माढा याने त्याच्या साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर एक पथक कुर्डूवाडीत जाऊन त्यांनी संशयित रित्या फिरणार्या सागर शिवाजी होनमाने,बाळू उर्फ ज्योतिराम चंद्रकांत कदम,रजत अबू मुलानी यांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडे अधिक तपास केला असता हा गुन्हा त्यांनीच केल्याचे कबूल केले.
ताब्यात घेतलेल्या सागर होनमाने याच्याकडून 72 लाख तररजत अबू मुलानी याच्याकडून 71 लाख 20 हजार रुपये जप्त करण्यात आले.अटक केलेल्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन पथके उदयपूर राजस्थान येथे पाठवण्यात आली तेथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने गौतम अजित भोसले,किरण सुभाष घाडगे व भूषण लक्ष्मीकांत तोंडे यांना अटक करण्यात आले.
ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटील, गणेश जगदाळे,सहाय्यक फौजदार रविराज कोकरे, तुषार पंदारे,बाळासाहेब करांडे,पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजय घुले, जनार्दन शेळके, राजु मोमीन, विजय कांचन,अशिफ शेख,अभिजित एकशिंगे,स्वप्निल अहिवळे,पोलीस शिपाई अक्षय नवले,प्रमोद नवले यांनी तसेच इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार,महेश माने, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पोंडुळे,पोलीस नाईक सलमान खान,पोलीस शिपाई विशाल चौधर,पोलीस हवालदार सुरेंद्र वाघ,कल्याण खांडेकर,सचिन बोराडे,मोहम्मद अली मडी आदींनी सहभाग घेतला.
