पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) लसीकरण क्षेत्रातील बादशाह व जगातील सर्वाधिक लसींचे उत्पादन करणारे सिरम कंपनीचे अध्यक्ष डॉ.सायरस पुनावाला यांना देशाचा सर्वोच्च गौरवशाली सन्मान ‘भारतरत्न’ हा पुरस्कार द्यावा,अशी  मागणी ‘भारत सन्मान फोरमच्या’ माध्यमातून करण्यात आली यासाठी खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत यांनाही भेटून पुनावाला यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी पत्र, भारत सन्मान फोरमचे अध्यक्ष युवराज हिरामण काकडे, उपाध्यक्ष तथा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख.मंगेश चिवटे व सचिव अँड.धनंजय मधवांन्ना यांनी केली.


जगातील १७० देशांना सिरम कंपनीत तयार होणार्या लसींचा पुरवठा केला जातो, काही देशांना सवलतीच्या दरात तर काही देशांना मोफतही लस दिली जाते, तर जगात जन्माला येणाऱ्या ५ मुलांपैकी ३ मुलांना (६५% जागतिक व्हॅक्सीनेशन) सिरमची लस दिली जाते, तर पुनावाला यांच्या काही लसी खूप कमी  किमतीत दिल्या जातात. ज्यावेळी १९६० च्या दशकात भारत आणि दक्षिणेतील देश (मुख्यतः आशिया, आफ्रिका) हे लशींसाठी पाश्चिमात्य देशांवर अधिक अवलंबून होते. त्यामुळे या देशांतील नागरिकांचे आयुर्मानही कमी होत होते. अशा परिस्थितीत या विकसनशील आणि अविकसीत देशांमध्ये परवडणाऱ्या किंमतीत लशी उपलब्ध होण्याची गरज होती. अशातच १९६६ साली सिरम कंपनीची स्थापना झाली आणि या राष्ट्रांना मोठा दिलासा मिळाला.कोरोनाने जगात हाहाकार माजवला तेव्हा लोकांचे प्राण वाचविणे महत्वाचे होते कोरोनावर प्रतिबंधात्मक लस तयार करण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न होत असताना सेरम कंपनीने विकसित केलेल्या कोविशिल्ड या लशीची परिणामकारकता अधिक असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली त्यानंतर आजतागायत  जगभरातील ९७ देशांना १२७ कोटी कोरोना लसींचा पुरवठा (२५ नोव्हेंबर २०२१ अखेर) सिरम कडून करण्यात आला. सिरम जीवनरक्षक लशींचे वर्षाला १.५ अब्ज पेक्षा जास्त डोस तयार करते. तसेच आदर पुनावाला क्लीन सिटीकडून मागील अनेक वर्षांपासून पुणे शहर स्वच्छ करण्यासाठीची मोफत मोहीम चालवली जाते.
डॉ.सायरस पुनावाला यांचे हेच राष्ट्रीय तसेच जागतिक  पातळीवरील मागील ४०/५० वर्षांचे योगदान पाहता, भारत सरकारने त्यांना सन २००५ साली पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे. तसेच जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित अशा नोबेल पुरस्कारासाठीही सन २०१८ साली पुनावाला यांचे, भारताकडून नामांकन करण्यात आल्याचे, रुबी हॉलचे विश्वस्त डॉ.परवेझ ग्रांट यांनी सांगितले. तसेच इतर देश विदेशातील अनेक नामांकित पुरस्कार डॉ.पुनावाला यांना प्राप्त झाले आहेत. डॉ.सायरस पुनावाला यांचे हे अखिल मानवजातीसाठी चालू असलेल अविस्मरणीय काम पाहता, त्यांना भारत सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न मिळण्यासाठीची मागणी, भारत सन्मान फोरम कडून करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *