किरण खुडे
        राजगुरुनगर  (हवेलीनामा ऑनलाइन) खेड तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून या पावसाचा शेतातील पिके तसेच विटभट्यांना फटका बसला आहे. बुधवारी (दि.१ ) पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरु होती तर सायंकाळी पावसाचा जोर वाढला त्यामुळे हातातोडांशी आलेला घास वाया जाणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे.
      तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वारंवार होणाऱ्या ढगाळ हवामानामुळे शेतातील रब्बी पिकांना धोका निर्माण झाला असून शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. बुधवारी पहाटेपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाने कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या पावसामुळे रब्बी हंगामातील कांदा, बटाटा, ज्वारी व पालेभाज्या तसेच अन्य पिकांना फटका बसला आहे. नोव्हेंबरच्या पहील्याच आठवड्यात झालेल्या पावसाने कांदा पिकांना अाधीच फटका बसला होता. शेतकऱ्यांनी पिकावर औषध फवारणी करुन पिके जगविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बुधवारच्या पावसाचा फटका बसल्यामुळे कांदा पिक पुर्णपणे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या तालुक्याच्या पुर्व भागातील दावडी परिसरात काही भागात ऊसाची तोडणी सुरु असून पावसामुळे शेतात चिखल निर्माण झाला आहे. त्यामुळे ऊस तोडणीच्या कामातही व्यत्यय आला आहे. तसेच शेतकऱ्यांनी कांदा काढणी सुरू केली आहे. काढणी केलेल्या कांदा पिकात पाणी साचलं आहे. हरभ-याच्या पिकात पाणी साचल्याने रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतक-यांवर अवकाळी पावसाने पुन्हा संकट आले आहे, असे निमगाव (ता. खेड ) येथील शेतकरी सोपान शिंदे यांनी सांगितले. तालुक्यात पुरेसा पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो, मिरची या बागायती पिकांची लागवड केली आहे. या पावसामुळे सरीत पाणी थांबल्याने ही पिके धोक्यात आली आहेत. या पावसाने विटभट्यांनाही मोठा फटका बसून त्यांचे माल भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *