पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)” भारतीय संस्कृती आणि परंपरेची ओळख संपूर्ण जगाला करून देण्यासाठी विश्व शांती केंद्र कार्य करीत आहे. शिक्षणाबरोबरच अध्यात्माच्या आधारे प्रत्येक मानवाला सुख, समाधान आणि शांती मिळण्यासाठी माता सरस्वती मंदिराची प्राण प्रतिष्ठा केली आहे. या विद्येच्या देवीच्या नावांनी मला पुरस्कार देउन मी आयुष्यभर केलेल्या कार्याचा हा गौरव आहे,” अशी भावना प्रतिभासंपन्न व संवेदनशील लेखिका सौ.सुरेखा शशिकांत शहा यांनी व्यक्त केली.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे राजबाग लोणी काळभोर येथील श्री विश्व दर्शन देवता मानवता मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात बंगळूर येथील लेखिका सुरेखा शशिकांत शहा यांना ‘ श्री सरस्वती देवी ज्ञान साधना पुरस्कार’ एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी त्यांनी आपली भावना व्यक्त केली.
या प्रसंगी एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश तु.कराड, गप्पाष्टकार डॉ.संजय उपाध्ये, मुंबई दूरदर्शन चे माजी संचालक मुकेश शर्मा आणि शशिकांत शहा हे उपस्थिती होते.
सुरेखा शहा म्हणाल्या,” बद्रीनाथ येथील श्री सरस्वती माता मंदिराची निर्मिती मानव निर्मित नसून, स्वतः सरस्वती माता यांनी डॉ. कराड यांच्यात प्रवेश करून याची निर्मिती करून घेतली आहे. ज्ञानाच्या देवीचे उपासक असल्याने ते ज्ञाना बरोबर विश्व शांतीचे मोठे कार्य करीत आहेत. आज याच कार्याची धुरा नवी पिढी पुढे नेतांना आनंद होत आहे.”
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले,” भारतीय संस्कृती, परंपरा आणि आध्यात्मिक तत्व जगासमोर मांडण्यासाठी सरस्वती मंदिराची निर्मिती झाली आहे. त्यातूनच भारतीय संस्कृतीचा वैश्र्विक संदेश जगासमोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. आज आमच्या हातातून जे कार्य होत आहे त्याला प्रयाग अक्का कराड यांचा आशीर्वाद आहे.”
डॉ.संजय उपाध्ये यांनी प्रस्तावनेत सांगितले की, बद्रीनाथ येथील सरस्वती माता मंदिराची निर्मिती फक्त ६३ दिवसात झाली. येथून ज्ञानाच्या प्रसाराबरोबर संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पसायदान जगभर पोहोचविण्याचे कार्य डॉ. कराड यांच्या मार्फत होत आहे. त्यांनी नेपाळ येथे बांधलेल्या घरांनाही संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराज यांचे नावे दिली आहेत.”
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे प्र कुलगुरू प्रा. डॉ. मिलिंद पांडे यांनी सूत्रसंचालन केले.
