राजगुरुनगर  (हवेलीनामा ऑनलाईन) तुटपुंजा पगार, रखडलेला महागाई भत्ता, वेतन करार आदी विविध मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विविध संघटनांनी पुकारलेल्या बेमुदत उपोषणात सहभाग दाखवत येथील राजगुरुनगर एसटी आगाराच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी आज (गुरुवार) सकाळ पासून उपोषणास सुरुवात केली. त्यामुळे राजगुरुनगर एसटी आगाराची सर्वच प्रवासी वाहतूक बंद ठेवावी लागली. यामुळे विद्यार्थी, नोकरदार, अबालवृद्धांसह सर्वचप्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तर पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची पीएमपीएमएल बसमुळे गैरसोय टाळता आली.
काही कर्मचारी बांधवांनी आर्थिक चणचण व वैफल्यग्रस्त भावनेतून टोकाचं पाऊल उचलुन आत्महत्या केल्याने कोरोना महामारीनंतर भविष्यात भेडसावणारा हा प्रश्न सर्वच कर्मचाऱ्यांबाबत निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन व्हावे, कर्मचाऱ्यांना राज्यशासनात विलीन करुन घ्यावे. या मागण्यांकडे सरकारचं व महामंडळाचं लक्ष वेधण्यासाठी हे बेमुदत उपोषण सुरु केल्याचे अध्यक्ष शिवाजी शिंदे व सचिव रमेश वाडेकर यांनी सांगितले. तसेच मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यत हे उपोषण चालुच रहाणार आहे असेही त्यांनी सांगितले.
या उपोषणात राजगुरुनगर एसटी आगारातील सर्वच कर्मचारी सहभागी झाले. कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, सचिव रमेश वाडेकर, वाहतूक नियंत्रक दिलीप तापकीर, दिलीप चौधरी, माणीक थिगळे, माऊली करंडे, अमित जगताप, दत्ता गभाले, गुलाब तिटकारे, कालिदास चिखले,भारत वाबळे, मयुर सांडभोर, निलेश सातकर, सादिक इनामदार, रहिम आतार, कैलास वाघमारे, विलास बांबळे, महादेव तुळसे, बाळासाहेब कराळे, बाळासाहेब नांगरे यांनी उपोषणात सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *