राजगुरुनगर (हवेेेलीनामा ऑनलाइन) येत्या महिन्याभरात राजगुरुनगर बाजारपेठ ते चांडोली यांना जोडणाऱ्या पूलाचे काम सुरू झालेले असेल, तसेच लवकरच आताच्या पंचायत समिती कार्यालयासमोर नऊ मजली प्रशासकीय इमारत उभी राहणार असून राजगुरुनगर शहराच्या सौंदर्यात भर घालणारी ही वास्तू असेल असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी येथे केले.
राजगुरुनगर व्यापारी संघ बाजारपेठ आणि शास्त्री चौक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याशी व्यापारी बांधवांशी वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यापारी महासंघाचे विजयकुमार भनसाळी, राम कडुसकर, रविंद्र गुजराथी मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले बाजारपेठ ते चांडोली यांना जोडणारा भीमानदीच्या पुलाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची व्यापारी बांधवांची प्रलंबित आहे, परंतु निरनिराळ्या कारणास्तव तसेच कोविडच्या समस्येमुळे गेले काही दिवसांपासून हा प्रस्ताव पडून होता. आता या प्रस्तावावर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करून हे काम सुरू होणार असल्याचे ते म्हणाले. तसेच पंचायत समिती समोरील नवीन प्रशासकीय इमारतीत दोन मजले पार्किंग, तर वरील मजल्यांवर अनुक्रमे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, प्रांताअधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय तसेच दोन प्रशस्त हॉल अशी या इमारतीची रचना असेल सर्व विभागांशी समन्वय साधून जागेचे हस्तांतरण झालेले आहे. तसेच प्रशासकीय बाबींची पूर्तता करून लवकरच या कामाची सुरुवात केली जाणार आहे असेही त्यांनी सांगितले. व्यापारी बांधवांच्या समस्यांबाबत बोलताना ते म्हणाले, अनेक ठिकाणी शासकीय अधिकारी नागरिकांना लालफितीच्या कारभारात अडकवत असून कामाची पूर्तता करत नसल्याने सुचवलेल्या काही विकासकामांना विलंब होऊ शकतो. परंतु तरीही राजगुरुनगर शहराच्या विकासात भर टाकण्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन केले आहे. वडगाव पाटोळे ते राजगुरुनगर यांना जोडणारा पूल प्रस्तावित असून राजगुरुनगर ते राक्षेवाडी यांना जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. तसेच भावी काळात चांगल्या विचारांचे लोकप्रतिनिधी नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद येथे निवडून येतील आणि तालुक्याच्या विकासात सर्वांगीण भर घालण्यात येईल. याशिवाय लोहमार्गाचे जाळे खेड तालुक्यात होणार असून भावी काळात खेड तालुका हा विकासाचे एक महत्त्वाचे दालन उघडणारा असेल अशीही माहिती त्यांनी दिली.
प्रास्ताविकात बोलताना किरण खुडे यांनी कोरोना महामारीमुळे व्यापारी बांधवांवर उद्भवलेली परिस्थिती तसेच लॉकडाऊनमुळे व्यापारावर आलेले निर्बंध, शहरात प्रवेश करताना होणारी वाहतूक कोंडी, दर्जाहीन रस्त्यांची कामे व बाजारपेठसाठी पुलाची असलेली गरज तसेच इतर समस्यांविषयी माहिती दिली.
कार्यक्रमापूर्वी स्व. सागर मणियार यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात मृत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणारे संदीप खुडे, कोंडीभाऊ पवार, ओंकार खुडे यांना आमदारांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत राम कडुसकर यांनी केले. व्यापारी महासंघाच्या वतीने रवींद्र गुजराथी व विजयकुमार भनसाळी यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण खुडे यांनी केले. याप्रसंगी कुशल ओसवाल, योगेश कर्नावट, सुभाष जंगम, परेश शहा, दिनेश पालीवाल, श्रीकांत कळसकर, किशोर ओसवाल, छगनलाल ओसवाल, सुशील शिंगवी, सतीश शहा, प्रशांत कर्नावट, मुबारक आतार, प्रफुल्ल शहा, महेंद्र मधवे, जैनम मनियार आदी उपस्थित होते.
